Thursday, November 08, 2007

जानू... त्यानंतर मी जानूला आजतागायत पाहिलेलं नाही.

*******
दिवाळीच्या आधीचे दहा-एक दिवस म्हणजे जानूच्या वरकमाईचा 'पीक पीरिअड'. अख्ख्या चाळीची - चाळीतली घरे धरून - साफसफाई करण्याचं कंत्राट त्याच्या हातात पडलं, की घराघरातून मिळणारी दिवाळी, चाळीच्या सफाईची कमिटीने ठरवलेली रक्कम आणि गोडाधोडाचं जेवण यात त्याचीही दिवाळी चांगलीच साजरी व्हायची. माझ्या आईबाबांच्या महिन्याच्या घेणेकर्‍यांच्या यादीत दिवाळीच्या महिन्यात पोस्टमन, टेलिफोनवाले,भंगी यांच्या जोडीला जानूचंही नाव सामील व्हायचं. अभ्यंगस्नानानंतरचा फराळ चवीचवीने खाण्यात नि गप्पाटप्पा करण्यात घरातील मंडळी मश्गूल, फटाके उडवण्यात आम्ही पोरं मग्न आणि जवळच्या 'समुद्रा'मध्ये नारिंगी मारण्यात जानू बुडालेला. बोळातल्या सप्तरंगी फरशीवर पडलेले भुईचक्रांचे नि अनाराचे डाग, त्यांचे जळून गेलेले तुकडे, फुटलेल्या लक्ष्मी बारच्या दारूचा वास, फुलबाज्यांच्या कांड्या दुसर्‍या दिवशी गायब दिसत; तिकडे डोकीला चट्टेरीपट्टेरी गुलाबी-पांढरा मफलर गुंडाळून जानू वाकडातिकडा झोपलेला असायचा. त्या चट्ट्यापट्ट्यांत विणलेले स्वतःच्याच आयुष्याचे कित्येक रंग, त्याला बोळातल्या मीटरबॉक्सच्या आसपास कबुतरांनी घातलेल्या शिटांच्या रांगोळीसारखे तरी वाटले असतील का, याचा विचार मी अजूनही करतो आहे.

आयुष्यभर लाल आणि राखाडी अशा दोनच चड्ड्यांमध्ये जानू वावरत असावा. जानू बाल्या नव्हता. गळ्यात रुमाल नाही, पायात घुंगरू नाही, तोंडी बाल्यांची भाषा नाही नि बोलण्यात ते हेल नाहीत. फक्त चड्डी, काखेत आणि मानेजवळ झुरळांनी खाऊन झालेल्या लहानमोठ्या भोकांच्या नक्षीचा बाह्यांचा गंजीफ्रॉक, मातकट तपकिरी पण तजेलदार त्वचा, मिठाईवरच्या चांदीच्या वर्खासारखे वाटणारे खुरट्या गवतासारखे छातीवरचे नि डोक्यावरचे चंदेरी-राखाडी केस, पिवळट तर्राट डोळे, ओठांवर, गालांवर नि हनुवटीवर इंच-दीड इंच वाढलेले तण, ट्रकमध्ये भिरकावलेलं धान्याचं पोतं जसं एकाच बाजूने आत जातं; तसं करदोर्‍याचा वर एकाच बाजूने खपाटीला गेलेलं पोट, आणि गावच्या भातशेतीपासून राजकारणापर्यंत सगळ्या विषयांवर हक्काने बोलताना पाच मिनिटांनी एकदा या रेटने गंजीफ्रॉक वर करून गजकर्ण झाल्यासारखा कंबर कराकरा खाजवणारा जानू पाहतच मी लहानाचा मोठा झालो. मतदानाला आणि लग्नसमारंभाला जाताना लाल चड्डीवर घालायचा काळे त्रिकोण-चौकोन-वर्तुळे असलेला भूमितीय बुशकोट, पानाची चंची, दाढीचं सामान, त्यातच फुटक्या आरशाच्या काचेचा तुकडा, कंगवा आणि माझ्या शाळेच्या दप्तरापेक्षा जराशी मोठी एक पत्र्याची ट्रंक ही जानूची जन्मभराची पुंजी. इतक्या मोजक्या (की मोडक्या) पुंजीत त्याने आपल्या मुलीचं - सोनीचं लग्न लावलं, बायकोच्या शेवटच्या दिवसात मुंबईतूनच तिचं आजारपण काढलं, आपल्या मुलाला - दाम्याला जेमतेम शिकवून मुंबईत नोकरीला आणलं. चौदा-पंधरा वर्षांपूर्वी बोळात दामूबरोबर गोट्या खेळताना हाच पोरगा उद्या आमच्या घरी जानूबरोबर भांडी घासायला येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. धुणीभांडी हा जानूचा खानदानी रोजगार असावा बहुतेक!

जानू भुवडला कोकणातल्या तळे गावातून बनूताईंनी दादरला आमच्या चाळीत आणलं. गिजा,आनंदी, शेवंता, नारायण, बाबू, रोंग्या ... किती नावं घ्यावीत?! आजकाल बड्या धेंडांच्या वॉचमनची केबिन असते तेव्हढ्या आकाराच्या, चाळीत शिरल्याशिरल्या चौकाला लागून असलेल्या एका खोलीत चाळीच्या सात गड्यांचं कुटुंब जेवायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं... जानू त्यांच्यातल्या सगळ्यात नशीबवान गडी. त्याने आल्यापासूनच धरलेला तिसरा मजला कधी सोडलाच नाही. घराघरातून मिळणारं दिवसाचं उरलेलं जेवण, कधीकधी सेन्ट्रल लंच होमचा तळलेला थंडगार बांगडा, सुका फळफळीत भात आणि समुद्राची नारिंगी यापुढे त्याला काही शिजवायची गरजच पडली नाही. पण अशा रावसाहेबी थाटांपुढे त्याने कामात कुचराई केली नाही. इमानेइतबारे धुणीभांडी करत राहिला. अभ्यास केला नाही तर थोतरीत ठेवून देताना समस्त आयांनी "कार्ट्या, जानू व्हायचंय का?"म्हणून त्याचा तसा आदर्शही काही काळ आम्हा सगळ्यांपुढे ठेवलाच होता. असं म्हटल्यावर जानूही तंबाखूने तांबडेपिवळे झालेले दात विचकून "फुकनीच्या, लिव नीट न्हाय्तर ही माज्या बापाचा सत्कार कराय्लिये" म्हणून विचित्र हसायचा. त्याचं ते शिवराळ हसणं मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला साजेसंच होतं. जानूला भडकलेलं मी कधी पाहिलंय असं नीट आठवत नाही. जेव्हा तो हसायचा नाही तेव्हा भडकलेला, वैतागलेलाच असायचा, असंही कदाचित म्हणता येईल. त्याच्या चेहर्‍यावरच्या सतरंज्या झोपताना, भांडी घासताना, पेपर वाचताना (खरे तर बघताना!) आणि शिव्या देताना सारख्याच रिन्कल फ्री असायच्या. त्याच समर्पित कर्मयोगी भावनेनं तो भांड्यांना राखुंडी लावायचा, ती विसळायचा.

माझ्या वडिलांच्या पिढीपासून चाळीतलं प्रत्येक पोर तीनेक वर्षाचं होईस्तोवर जानूबरोबर खेळलेलं आहे. मी सुद्धा. माझ्यासोबत किंबहुना माझ्यामागे सहा-सात वर्षांनी वाढलेल्यांनादेखील जानूची गावरान बडबडगीतं आजही तोंडपाठ आहेत. शेजारच्या प्रियांकाचं नावही नीट न घेता येणारा जानूच फक्त तिला गौरी म्हणतो. गौरी हे आपल्याच लेकीचं दुसरं नाव आहे, हे तिच्या आईवडिलांच्याही लक्षात नसेल कदाचित, पण जानूला मात्र बरोबर माहीत आहे. मी, प्रियांका, कुणाल, अमोघ ... डावा हात वर करून, उजवा हात कमरेवर ठेवून, गुडघ्यात जरासं वाकून ढुंगण हलवत नाचणारं आमच्यापैकी कोणीतरी आणि समोर अगदी तसाच नाचणारा जानू असं छायाचित्र माझ्या आठवणींचे अल्बम सोडून दुसरीकडे कुठेही नाही. वयोमानानुसार जानूचं शरीर थकलं, पण त्याचं पोरं खेळवणं थकलं नाही, नाचगाणं थकलं नाही; गावाकडच्या गोष्टी थकल्या नाहीत आणि त्याचं ते विचित्र हसणंही थकलं नाही. जानूशी आमची मैत्री न रुचलेल्या काही दुष्ट आईवडिलांनी तो करणी करत असल्याची कंडीही काही काळ पिकवली होती. एका मध्यरात्री "धरलान् धरलान् आईच्याने ... ये भोकाच्या ... छाताडावरचा ऊट ... धरलान् धरलान्"असं भेसूर ओरडत झोपेतून उठून शून्यात गेलेला जानू बघितल्यापासून तर या अफवांना अधिकच जोर आला. सुदैवाने त्याची परिणती जानूची चाळीतली कामं जाण्यात आणि आमच्यासारख्या अनेकांच्या अयुष्याची सुरुवातीची तीन वर्षं बेरंग होण्यात झाली नाही, याचं समाधान आहे. का कोण जाणे, पण जानूचं पोरांवरचं आणि पोरांचं जानूवरचं प्रेम, ते जिव्हाळ्याचे बंध यांना पालक वर्गाकडूनही स्वीकृती मिळू लागली असावी, असं आज वाटतं.

चाळीच्या चौकातली दहीहंडी जानूच्या गाण्यांशिवाय चालूच व्हायची नाही. गडी आणि आम्ही मुलं एकत्र येऊन दहीहंडी साजरी करायचो. चाळीतल्या आम्हा मुलांप्रमाणेच हंडी फोडण्याचा मान गड्यांमध्येही कोणालातरी कधीतरी मिळायचाच. पण 'येक दोन तीन चार, जनाबायीची प्वरं हुशार','ल्लाल ल्लाल पागुटं गुलाबी श्येला, जानूमामा गेला जीव झाला येडा' ही सगळी गाणी जानूने - आणि त्याच्या मागोमाग आम्ही - म्हटल्याशिवाय टांगलेल्या हंडीभोवती फेर धरायचाही उत्साह कुणाच्यात संचारायचा नाही. त्याच्या आवाजाने मग चाळ जागी व्हायची आणि आमच्यावर दुधापाण्याचे अभिषेक व्हायचे. हंडीनंतरचं गूळखोबरं वाटायलाही जानूच चाळभर फिरायचा. अंघोळी वगैरे आटोपून आम्ही आणलेल्या समोशांवर ताव मारायचो आणि जानू मात्र तेव्हा सरळ 'समुद्रा'च्या वाटेवर असायचा. होळीच्या रात्री बोंबा मारायला जातीने हजर आणि कार्यतत्पर असणारा जानू दुसर्‍या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी मात्र नेमाने गायब असायचा. संध्याकाळी तो चाळीत गपगुमान फिरताना, काम करताना दिसला की त्याच्या डोक्यावरचा गुलाल पाहून त्याची रंगपंचमी रंगीत आणि नारिंगीने सुगंधितही झालेली आहे, हे कळायला कुणी तज्ज्ञ लागायचा नाही. पण चाळीतल्या अशा प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाचा जानू एक अविभाज्य घटक असायचा. गणपतीच्या वेळी साधा आरतीला गेलाबाजार आरतीचा प्रसाद हाणायलाही चौकात न उतरणारा जानू नाटकाच्या रात्री फुकटात मसाला कॉफी प्यायला मिळते म्हणून आणि दुसर्‍या दिवशी महाप्रसादाला चमचमीत जेवायला मिळतं म्हणून (अर्थातच फुकटात!) बरोबर हजेरी लावायचा. लोक देवाच्या भक्तीत दंग असताना याची मोरीत भांड्याकुंड्यांशी भजनं रंगलेली असत. किंबहुना देवाशी त्याचं भांड्यांमुळेच भांडण असावं, असंसुद्धा वाटतं कधीकधी.

आमच्यासारखे काही महाभाग जानूत गुंतणं स्वाभाविक होतं. पण जानू आमच्याबरोबरच आमच्या आजीआजोबांच्या पिढीतही गुंतला होता. माझी आजी भ्रमिष्टावस्थेत "जानू जरा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे?" असं बरळली असताना हेलावून त्याने तिच्या पायावर डोकं ठेवलं होतं. "संध्याकाळी देतो आजी" यापलीकडे तो काही बोलू शकला नाही. आजपर्यंत फक्त त्या दिवशीच मी त्याच्या चेहर्‍यावरची सतरंजी विस्कटलेली पाहिली.

कामाच्या वेळी यंत्रवत्, आत्ममग्न काम; आणि काम नसेल तेव्हा निव्वळ टाइमपास, हे जानूच्या जगण्याचं सूत्र. जानू जरासा बेदरकार होता, व्यसनी होता, हे सगळं खरं आहे. पण त्याने कधी स्वतःच्या व्यसनांचा तमाशा केला नाही. दारू पिऊन आलेला असला, तरी आरडाओरडा, धिंगाणा नाही; मोठमोठ्याने अर्वाच्य शिवीगाळ नाही. "बाबा लय पितु" असं दामूही दोनेक वर्षांपूर्वी म्हणू लागला होता. तटस्थपणे त्याच्या पिण्याची कारणं शोधून काढायचं सामंजस्य, इच्छा, वेळ, कुवत - यांपैकी काही एक माझ्याकडे त्यावेळी नव्हतं. ना त्याची परिस्थिती, दु:ख वगैरे समजून घेण्याचं माहात्म्य होतं. जानूच्या वर्तणुकीतून तो मला जसा उलगडत गेला, तसा मी त्याचे हे सगळे रंग बघत गेलो. जानूचं जगण्याचं तत्त्वज्ञान काय, याचा अर्थही माझ्याच परीने लावलेला. उद्या त्याला असे भलतेसलते प्रश्न विचारायला गेलो, तर तो मला वेड्यात काढेल आणि असा काही (नेहमीसारखाच!) विचित्र हसेल, की माझ्यासारख्या पांढरपेशाला शरम वाटेल. असे चौकटीतले विचारच माझ्यासारख्यांना यंत्रांमागच्या भावना कळू देत नाहीत, असं वाटतं. मी भारत सोडून येताना बोळात जानू नेहमीसारखाच झोपला होता. भारतभेटीच्या वेळी "काय जानू, काय म्हन्तासा?" असं विचारायची संधी मिळेल आणि जानूही त्याला शिवराळ हसून उत्तर देईल असं वाटलं. म्हणूनच मी त्यावेळी त्याच्या पाया पडण्यासाठीही त्याला उठवलं नाही.

... त्यानंतर मी जानूला आजतागायत पाहिलेलं नाही