Wednesday, July 12, 2006

आजी नावाची मैत्रीण

मनोरमणा, मधुसुदना,
मुखी राहो माझ्या,
प्रभो हे नाम सदा

आजीचं हे गाणं ऐकलं की आमच्या घरातला मधुसूदन (म्हणजे मी!) डोळे किलकिले करून स्वयंपाकघरात बघायचा. मोरीतून नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेली, डोक्याला पंचा गुंडाळून, देवाला उदबत्ती ओवाळणारी आजी दिसायची. निळ्या किंवा गुलाबी फ़ुलांचं नाज़ूक नक्षीकाम केलेली पांढरी नऊवारी, डोळ्याला दुधी काचांचा, ज़ाड काळ्या फ़्रेमचा चष्मा आणि गोड आवाज़ातली भक्तीगीतं. स्वयंपाकघरातून दरवळणारा उदबत्तीचा मंद सुगंध. सकाळचे सहा वाज़लेत, हे सांगायला आमच्या घरात गजराच्या घड्याळाची गरज़ नव्हती. आजीचं 'मनोरमणा, मधुसुदना' पुरेसं होतं.

मधुसूदन आणि चक्रपाणि या नावांमधली समानता आजीने तिच्या जिवापाड ज़पली होती. माझ्या रुपाने साक्षात तिचा बाळकृष्णच या पृथ्वीतलावर अवतरल्याचा साक्षात्कार तिला झाला आणि तिने अस्मादिकांचं नामकरण 'चक्रपाणि' असं केलं. तिच्या बालपणीच्या एका लाडक्या वर्गमित्राचं नाव चक्रपाणि होतं, असं तिने सांगितलं होतं. हा चक्रपाणि म्हणजे माझ्या आजीचं त्यावेळचं 'क्रश' असावं, म्हणून मी तिला चिडवतही असे. मग आई डोळे वटारून बघत असे; पण त्यातही आजीला काय मजा आणि कौतुक वाटायचं तिचं तिलाच ठाऊक! "बघ गो, बंड्या कसा अगदी बाळकृष्णासारखा खोडकर आहे!", असं आजीने म्हटलं रे म्हटलं की माझ्यात विजयश्री संचारायची आणि पोरापुढे पड खायला लागली की आई ज़रा तणतणतच आपल्या कामाला लागायची.

आजीच्या सगळ्या नातवंडांमध्ये मी शेंडेफळ. खरे सांगायचे तर मी शेंडेफळाचे शेंडेफळ. म्हणजे बाबांच्या (की आज़ोबांच्या? ;)) कृपेने आम्ही आजीच्या खास मर्जीतले. मग तिचं प्रेम थालिपीठ, ताकाची उकड, मोकळी भाज़णी, आप्पे, उपमा, पोहे अशा अनेक रुपांमधून ओसंडून वहायचं. आजीच्याच हट्टाखातर माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. मूलभूत शिक्षण हा ज्ञानाचा पाया; तो मातृभाषेतच भक्कम व्हावा, यावर आजीचा अढळ विश्वास होता. छोट्या शिशुत असल्यापासून शाळेच्या नि माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, शिशुवर्गातल्या 'शि शु' पासून ते बाराखडी, घड्याळ, वार-महिने, पाढे सगळं सगळं आजीने इतकं लीलया सांभाळलं, की नोकरदार आईबाबांना कसली चिंताच नको! आईबाबांनी मला जेव्हढं झोडपलं, त्याच्या एक सहस्त्रांशही आजीने केलं नसेल. तिने माझ्यावर हात उगारलेला मला मुळी आठवतच नाही. आजी रागावली, की तिच्या डोळ्यांत आणि आवाज़ातच तिला काय म्हणायचंय आणि मी काय केलं पाहिज़े, हे कळून चुकायचं. ज़राशा धोक्याच्या अज़ाण वयात पहिल्यांदा बरोबरीच्या मुलांच्या नादाने ज़ुगार खेळलो होतो, तेव्हा मात्र तिने थोबाड रंगवल्याचे चांगलेच आठवते आहे. नंतर ती माझ्याशी आठवडाभर बोलली नव्हती. शेवटी मी कळवळतोय, हे बघून आईनेही तिचे पाय धरले, तेव्हा ति काहीशी नरमली.

बेळगावातल्या खानापूरसारख्या छोट्या गावातून लग्न होऊन मुंबईत आलेली माझी आजी आयुष्यातली सोनेरी वर्षं बिनपगारी मोलकरणीसारखी ज़गली. आज़ोबांच्या तऱ्हा सांभाळणं काही खायचं काम नव्हतं; पण तऱ्हेवाईक नवरा आणि पोटची तीन मुलं असा रगाडा तिने यशस्वीपणे सांभाळला. प्रसंगी आज़ोबांच्या बुटांचा मार खाल्ला, पोरांची आज़ारपणं सोसली, पण हूं नाही की चूं नाही. 'पत्नी' या व्यक्तिरेखेकडून त्या काळात ज़े अपेक्षित होतं, ते तिनं इमानेइतबारे पार पाडलं. आज़ोबा निवृत्त झाल्यावर त्यांच्याबरोबर संध्याकाळी वेणीफणी, गज़रा, पावडर करून एकदम 'टिपटॉप' फ़िरायला, बाज़ारहाट करायला ज़ाणं; नातवंडांना गोष्टी सांगणं आणि त्यांच्याबरोबर खेळणं, हे आजीच्या नशिबात तसं उशीराच आलं, असं म्हणायला हवं. आईबाबांकडून या सगळ्या गोष्टी ऐकताना आजीबद्दलचा आदर आणि प्रेम दुणावतं. ज़ावयाच्या मोठ्या पोरीला ज़वळज़वळ आठ-एक वर्षं स्वतःच्या पोटच्या पोरीसारखं वाढवणारी आजी, माझ्या चुलतभावंडांचे धिंगाणे नि सगळ्या मर्कटलीला सोसणारी आजी, हे सगळं मला नुसतं ऐकायलाच मिळालंय. पण तिच्या सहवासात मी ज़े अनुभवंलय, ते शब्दांत - आणि तेही मोज़क्या - मांडणं खरोखरंच कठीण आहे.

आजी तशी हलक्या कानाची. कुणी तिला काहीही थोड्याशा 'कन्विन्सिंग' पद्धतीने सांगितलं की तिचा त्यावर लगेच विश्वास बसायचा. मामाआज़ोबांबरोबरची तिची भांडणं नि त्यानंतर धरलेला अबोला, काकूबरोबर उडालेले खटके, आईबरोबरची वादावादी सगळे त्याचेच छोटेमोठे परिणाम. रागावली, की तिच्या आवाज़ाला आणि भाषेला खास बेळगावी धार चढायची. मग समोर उभी असलेली व्यक्ती माझे बाबा असोत, शेज़ारच्या कानिटकर आजी असोत, की भांड्याला येणारा जानू गडी असो. "आमचंच खाऊन दात काळे झालेत त्या XXXच्या कानिटकरणीचे!" हे जेव्हा मी पहिल्यांदा आजीच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पायाखालची ज़मीन सटकली होती दोन सेकंद. जानूमामाची तर ती ज़वळज़वळ दररोज़ बिनपाण्याने हजामत करायची. 'मी, माझी मुलं आणि नातवंडं सद्गुणांचे पुतळे आणि ज़ावई नि सुना एक नंबर हरामखोर', हा तिचा समज़ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणी दूर करू शकले नाही. पण शेवटच्या काही क्षणांमध्ये, तिच्या भ्रमिष्टावस्थेत, जेव्हा अगतिकपणे 'जानू, ज़रा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे', असं तिने विचारलं तेव्हा जानूमामाही हेलावला होता. ती कितीही रागीट असली, तरी तिचा रागही बहुतेक सगळ्यांना हवाहवासा होता ;) अखेरच्या काही दिवसात, तिला पंख्यावर दत्ता फडणीस म्हणून कोणीतरी दिसायचा. "दत्त्या, मेल्या, पंख्यावर काय बसतोस? खाली ये की मुडद्या" कधीकधी रात्रभर असं चालायचं आणि आम्ही पंख्यावर दत्त्याला शोधायचो. मालूने (आजीची सगळ्यात धाकटी बहीण) प्रेमानंदाशी पळून ज़ाऊन प्रेमविवाह केला, असं जेव्हा आजीने म्हटलं, तेव्हा त्याही प्रसंगात आम्ही पोट धरून हसलो होतो.

'लीलाच्या नातवाने नाव काढलं हो!' असं तिच्या बहिणींनी म्हटलं, की तिला कोण आनंद व्हायचा. मग ती लगेच मला कुशीत घ्यायची. 'लीलाचा नातू' ही ओळख माझ्यापेक्षा तिला जास्त महत्त्वाची होती. शेवटी शेवटी तिचे जे काही श्वास चालू होते, ते फ़क्त 'लीलाच्या नातवा'साठीच होते. छताकडे डोळे लावून कॉलेजला ज़ाताना "बंडू, आल्यावर काय करायचं रे खायला?", असं तिने विचारलं, तेव्हा गलबलून आलं. "आजी, उकड कर मस्तपैकी" असं सांगून मी घरातून तातडीने बाहेर पडलो होतो. मला तिकडे थांबणं ज़मलंच नसतं.

सात-आठ वर्षांपूर्वी मी तिला म्हटलं होतं की मी तिला माझ्याबरोबर अमेरिकेला नेईन. मी सोडून सगळ्या नातवंडांच्या लग्नाला ती हज़र होती आणि म्हणूनच माझ्या लग्नाआधी डोळे मिटायचे नाहीत, असं मी तिच्याकडून प्रॉमिसही घेतलं होतं. कदाचित तिला काही बातम्या आधीच कळल्या होत्या. म्हणून बारावीत असतानाच मी तिला 'लग्नाळू' झाल्यासारखे वाटत होते.

बारावीचा निकाल लागला, आणि त्यातलं माझं सुयश हीच तिच्या आयुष्यातली शेवटची आनंदाची बातमी ठरली. कदाचित ती या बातमीचीच वाट बघत थांबली होती. आज़पर्यंत कोणत्याही परीक्षेला ज़ाताना तिच्या पायाला हात लावून ज़ायची इतकी सवय झाली होती, की अभियांत्रिकीची चार वर्षं तिच्या नुसत्या फ़ोटोच्या पाया पडणे खूपच ज़ड ज़ात होते. काही गोष्टी मनाविरुद्ध करायला लागतात; त्यातलीच ही एक.

१ ऑगस्टला ती गेली. "पुण्यवान आहे माझी आजी. टिळकांबरोबर गेली" मी म्हणालो होतो. माझ्याकडून तीच श्रद्धांजली होती. माझ्याबरोबर खेळणारी, खाऊ खाणारी, गाणी म्हणणारी माझी बालमैत्रीण हरवली.

गेल्या वर्षी माझं ३१ जुलैचं अमेरिकेचं विमान पावसामुळे एक दिवस उशीरा सुटलं; म्हणजे १ ऑगस्टला! मी आजीला म्हटलं होतं ना, माझ्याबरोबर अमेरिकेला नेईन म्हणून; थांबली होती ती! आज़ आहे इकडे माझ्याबरोबर.