Sunday, October 26, 2014

नसलेल्या ताईचा कोष

 रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवशी मी फक्त माझाच राहतो - स्वेच्छेने नाही, नाईलाजाने! या दोन दिवशी मनाच्या तळघरात गाडलेली एक अनाम, अकारण, निरर्थक भीती डोकं वर काढते - जवळची सगळ्यात प्रिय माणसं कायमची गमावण्याची भीती. माणसं जमवण्याच्या आणि प्राणपणाने जपण्याच्या अंगभूत सवयीचं, ही भीती, हे 'बायप्रोडक्ट' आहे. पण ही भीती प्रत्यक्षात न जमवलेल्या कोणाच्या ऑलरेडी गेले असण्यानं पैदा होऊ शकते? कदाचित हो - निदान माझ्या बाबतीत तरी असंच झालं असेल.

ताईचं नाव शिवानी. तिचे एक-दोन वर्षाची असतानापर्यंतचे मोजके फोटो, हीच आणि इतकीच तिची नि माझी ओळख. फोटोत दिसणारं बाळ म्हणजे एकेकाळी अस्तित्त्वात असलेली माझी ताई, हे वास्तव समजायला काही वर्षं लागली. पण त्यानंतर आजतागायत दोन दशकं उलटूनही, हे वास्तव समजून-उमजूनसुद्धा स्वीकारता मात्र आलेलं नाही. चालू आहे तो फक्त ताई नसल्याच्या जाणिवेसोबतचा सततचा झगडा आणि तिचं माझ्याभोवती, मला समांतर, आभासी असणं. या अस्तित्त्वाचा कोष तयार केलाय मीच, आणि त्यात गुरफटूनही घेतलंय स्वत:ला - स्वेच्छेनं. आईकडून कितीतरी किस्से ऐकलेत - ती कशी दिसायची, कशी बोलायची, कशी खेळायची, मी आईच्या पोटात असताना पोटाला हात, कान लावून कशी ऐकायची आणि हसायची वगैरे. आणि जे आईने सांगितलं नाही, ते तिच्या डायरीत वाचलं, चोरून. मग अनेक गोष्टींचा उलगडा झाला हळूहळू. बाबा, आजी तिच्याबद्दल काहीच का बोलायचे नाहीत, आई सगळं डायरीत का लिहीत गेली वगैरे. कदाचित त्यामुळेच जेव्हढं माहीत झालं, त्यावरून अजाणतेपणाने तयार केलेला हा कोष मी कायमचा सांभाळायचा ठरवलं असेल.

नाही म्हणायला, गरज तर होतीच ताईची; अगदी रोज नाही नक्की, पण आई बेदम मारायची तेव्हा तिच्यापासून लांब पळून जाण्यासाठी, बिल्डींगमधल्या मित्रमैत्रिणींसोबत कडाक्याची भांडणं व्हायची तेव्हा आपल्या बाजूने कुणीतरी लढावं म्हणून, वडापाव आणि कोकसाठी पैसे मागता यावेत म्हणून, स्कूलबसमधून नाही तर पायी शाळेत जायचंय पण दादर स्टेशनासामोर स्वामीनारायण मंदिराजवळ क्रॉस करायची जाम भीती वाटायची तेव्हा, कुणाच्या तरी प्रेमात आकंठ बुडालो होतो आणि तिने नाही म्हटल्यावर झालेली कालवाकालव सांगायची होती तेव्हा, शाळेत नेहमी पहिला नंबर काढणारा मी मास्टर्स करताना लाज वाटेल असा जी.पी.ए का आणतोय याचा जाब द्यायचा होता तेव्हा, लग्नात मुंडावळ्या बांधून घ्यायच्या होत्या तेव्हा. गरज नाही कदाचित, स्वार्थ म्हणू हवं तर! या स्वार्थापोटी मग शिक्षण, नोकरी, देशांतर निमित्ताने संपर्कात आलेल्या ताईसारख्या अनेक मैत्रिणींमध्ये ताईला शोधलं, गरज भागवली, स्वार्थ साधला, रक्षाबंधन नि भाऊबीज जपली आणि अशीच एक मानलेली ताई गमावलीसुद्धा - खऱ्याखुऱ्या ताईसारखीच.….

….मग पुन्हा त्या भीतीने डोकं वर काढणं वगैरे नेहमीचंच! आता सवय झालीये.

आज भाऊबीज मोठी, सरते पुन्हा दिवाळी,
ओवाळण्यास मजला नशीब उरले आहे.

रेषा कुठली चुकीची कळण्यास वाव नाही,
भरल्या हातावरुनी नशीब उठले आहे.